घुसमट

पाऊस सुरू झाला. रस्त्याने पावसात भिजत, बाईकवर नखशिखांत भिजत जाणारे ते दोघे. त्यांना पाहून मनात विचार आला, असा पावसाळा माझ्या नशिबात कधीच येणार नाही का??? 
पण लगेच सावरलो. तू स्पष्टपणे सांगितलेला तुझा निर्णय आठवला व त्याच तिव्रतेनं मनात पुन्हा तिच जुनी वावटळ निर्माण करून गेला. तुझ्यासाठी तुझं करीअर ही सध्या सर्वोच्च प्रायोरीटी. तुझी स्वप्ने चौकटीबाहेरची, त्यासाठी तू निवडलेला मार्ग अतिशय खडतर आहे. त्यामुळे तुर्तास नात्यात न गुंतण्याचा तुझा निर्णय योग्यच असेल. तुझ्या स्वप्नांचा पाठलाग तू जिद्दीने करत आहेस. किती हिम्मत लागते हे करायला, ते आता कळत आहे. माझ्याविषयी तुझ्या मनात कधी काही विचार येत असेल नसेल ते कळायलासुद्धा मार्ग नाही. तू तुझ्या अभ्यासात बुडालेली. पण कधितरी महिण्यातून येणारा तुझा मेसेज फुंकर घालून जातो. एखाद्या शुष्क,ओसाड जमिनीत गवताचं पातं जगायचा अट्टाहास करतं, तसाच तुझ्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ‘मी’ अजूनही तग धरून आहे या जाणिवेने सुखावतो. माझ्या सभोवताली फिरणाऱ्या भ्रमरांकडे कधीही भरकटलो नाही. त्या मेसेजमधून येणाऱ्या प्रत्येक शब्दाने मला इतकी ताकद दिली. आधिही माझा अभ्यास सुरूच होता, पण आता त्याची दिशा निश्चित झाली आहे. दिवसरात्र माझं लक्ष्य गाठण्यासाठी मरमर करतो आहे.
तुझ्याकडून कुठलिही कमिटमेंट नसताना मी इतका फोकस्ड कसा काय झालो, माहिती नाही. तू यशस्वी झाली, व तेव्हा माझ्याकडे माझं स्वतःचं असं काहिही नसेल तर तुझ्याकडे कुठल्या तोंडानी जायचं, या भितीमुळे का होईना आयुष्यात कधी नव्हे ईतका सिरीयस झालो.
पुढचा रस्ताही बराच लांब आहे. सक्सेस मिळेल, तू हो म्हणणार ……..सगळ्या नंतरच्या गोष्टी…… तूझ्या रस्त्याने तू एकटी जात असणारही . . माझ्या रस्त्याने मात्र मी एकटा नाही….तुझी साथ सदैव असणार आहे, तेही तुझ्या कळत-नकळत.
हे सर्व समजावत असतो मी, स्वतःला, पण असा एखादा पाऊस येतो, मंद वारा सुटतो व छातितलं दुखणं पुन्हा सुरू करून जातो. नाईलाज अाहे, काय करणार.

—–अंत्यज—–

Leave a comment